‘श्रीमत् भगवत् गीता’ भगवत् गीता आणि इतर स्तोत्रे यांसंदर्भातील एक प्रयत्न....


जगद्गुरु व्यासांचा "महाभारत’ हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो. ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्’ असे म्हटले जाते. म्हणजे जे महाभारतात नाही ते या जगात नाही आणि जगात जे आहे ते सर्व महाभारतात आहे. ‘श्रीमत् भगवत् गीता’ हा महाभारतातील एक भाग आहे. कौरव पांडवांचे युद्ध सुरु झाले. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ युद्धभूमीवर आणला. समोर द्रोणाचार्य, भीष्माचार्य इ. गुरु तसेच बंधु, मित्र वगैरे पाहून अर्जुन व्यथित झाला. त्याने धनुष्य खाली ठेवले. आपल्याच लोकांना मारुन सुख काय मिळणार ? त्यापेक्षा भीक मागणे बरे ! या विचाराने त्याला घेरले. त्यावेळी क्षत्रिय म्हणून तुझा स्वधर्म हा ‘लढणे’ आहे, समोर कोणी का असेन तो शत्रू आहे असे सांगून भगवान श्रीकृष्णाने त्याला स्वकर्माला प्रवृत्त केले. नैराश्यातून चैतन्याकडे नेणारा स्वधर्माचा विचार ‘भगवत् गीता’ आपल्याला सांगते.

‘श्रीमत् भगवत् गीता’ आपल्याला वाचता यावी, पाठ असावी अशी अनेकांची इच्छा असते. परंतु योग्य शिक्षक न मिळणे, मिळाला तरी वेळा न जुळणे, लांब अंतरावर असणे अशा अनेक अडचणी येतात आणि मग शिकायचे राहूनच जाते. कधी पुस्तकावरून शिकायचे म्हटले तरी बरेचदा शब्दांचा योग्य उच्चार न जमणे, संधीविग्रह न जमणे या प्रकारच्या अनेक अडचणी येतात. यासाठी काही करता येईल का या विचारात असताना मला (हेमंत जोशी) या ई-बुकची कल्पना सुचली. ह्या प्रकारचे ई-बुक प्रथमच (माझ्या उपलब्ध माहितीनुसार) बनले आहे, ज्यात वाचन आणि ऐकणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येतात. येथे ‘श्रीमत् भगवत् गीता’ तसेच आणखी बरीच स्तोत्रे ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून दिलेली आहेत. गीतेमधील प्रत्येक अध्याय हा वेगळ्या ई-बुक स्वरुपात देण्यात आला आहे. ही सर्व पुस्तके मोफत आहेत. अजून काही पुस्तकांवर काम चालू आहे, यथावकाश ती देखील येथे उपलब्ध होतील. काही पुस्तके ही फक्त टेक्स्ट स्वरूपातच आहेत तर काही टेक्स्ट आणि ऑडियो अशा एकत्र स्वरूपात आहेत. ‘श्रीमत् भगवत् गीता’ आणि इतर पुस्तके ई-बुक स्वरूपात आणण्याचा मुख्य उद्देश हा की ती कोणत्याही ई-बुक रीडर वर वाचता येतात, जो रीडर तुम्हाला आवडतो तो तुम्ही वापरू शकता. प्रत्येक वेळी वेगळे ॲप डाऊनलोड करायला लागत नाही, फक्त ई-बुक डाऊनलोड केले की झाले. एकदा पुस्तक डाऊनलोड केल्यावर ते वाचताना आपल्याला इंटरनेटची आवश्यकता भासत नाही.

माझी आई सौ. रमा जोशी जी आज ७७ वर्षांची आहे. तिने आत्तापर्यंत अनेक लोकांना गीता, सप्तशती, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, ब्रह्मणस्पती, रुद्र यासारखी अनंत स्तोत्रे शिकवली आहेत आणि आजही ते काम तसेच अव्याहतपणे चालू आहे. हे अध्यापन आणि अध्ययन जवळून बघताना एक गोष्ट मला जाणवली, यातील बर्‍याच जणांना घरी सराव करताना अडचणी येत असत, तसेच आधी उल्लेख केल्या प्रमाणे अनेकांना इच्छा असून देखील येणे जमत नसे. त्यावर उपाय म्हणून प्रथम फक्त ह्या विद्यार्थ्यांसाठी या ई-बुक ची निर्मिती करायचे ठरवले, म्हणून ते माझ्या आईच्याच आवाजात करायचे ठरवले. कारण इथे जे जसे शिकले आहे तेच सराव करताना कानांवर पडावे आणि डोळ्यांसमोर असावे हाच हेतू. या वयाला देखील माझ्या आईने माझी इच्छा मान्य केली आणि ही ई-बुक स्वरूपातील भगवत् गीता प्रत्यक्षात उतरली.

नंतर असा विचार आला की आपण हे सर्व एखाद्या वेबसाईटच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवले तर कितीतरी जणांना ह्याचा फायदा होईल आणि मग या साईटची संकल्पना सुचली, लगेच त्यावर काम देखील सुरू झाले. भगवान श्रीकृष्णांच्या शुभाशीर्वादाने ती इच्छा प्रत्यक्षात उतरली. जवळ जवळ सर्व काम पूर्ण झाले होते पण अगदी थोडया कामासाठी मधे बराच कालावधी गेला. पण योग्य वेळ आल्यावर त्या योगेश्वराने सर्व काम पूर्ण करून घेतले. हे ई-बुक कसे डाउनलोड करायचे, ते कसे वाचायचे यासंबंधित सर्व माहितीसाठी खालील लिंकवर क्लीक करावे किंवा ‘ई-बुक कसे वाचावे’ या मेनूला जावे.